कळंब : प्रतिनिधी
कळंब ते येरमाळा रस्त्यावरील हासेगाव (केज) ग्रामपंचायत हद्दीतील राजश्री पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी ३ लाख २८ हजार रुपयाची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार (दि..२८) जानेवारीच्या रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी घडली. दरम्यान दरोडेखोरांनी अवघ्या चार मिनिटात पेट्रोल पंपावर दरोडा टाकून रोकड पळविल्याची घटना सीसीटिव्ही फुटेजवरून उघड होत आहे. या प्रकरणी रविवारी रात्री कलंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भगवान भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, येरमाळा-कळंब रस्त्यावरील हासेगाव ग्रामपंचायत हद्दीत हिंदुस्थान पेट्रोल पंप आहे. रविवारी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी दुचाकीवरून चार दरोडेखोर हातात कोयते घेवून आले होते. कोयत्याचा धाक दाखवून पंपावरील कामगारांना ऑफिसच्या चाव्याची मागणी केली.काही कामगारांनी चाव्या तत्काळ न दिल्यामुळे कोयते उगारून धमकावण्यात आले. घाबरलेल्या अवस्थेत कामगारांनी चाव्या दिल्या. ऑफीस मधील असलेल्या तीन कॅश काऊंटर मधून चोरट्यांनी ३ लाख २८ हजार रुपये घेवून दरोडा टाकला.
कामगारांनी दरोडा टाकल्याची माहिती राजश्री पेट्रोल पंपांचे भगवान भंडारी यांना दिली. भंडारी यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तत्काळ पोलिस दाखल झाले. दरम्यान गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी तत्काळ अतिरिक्त पोलिस अधीक्षक गौर हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक सुरेश साबळे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन गुन्ह्याची माहिती घेतली. दरोडेखोर हे आपापसात मराठीत बोलत होते. दुचाकीवरून चार दरोडेखोर ११ वाजून ५२ मिनिटांनी आले. ११ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे अवघ्या चार मिनिटात सव्वातीन लाखाची रोकड लुटल्याची घटना पंपावरील सीसीटिव्ही फुटेज वरून स्पष्ट होत आहे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत.