छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर पती-पत्नीच्या भांडणाची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. डॉक्टर पत्नीने रागाच्या भरात स्वत:च्या घरालाच आग लावण्याचा प्रकार केला आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अखेर डॉक्टर पतीने पत्नीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात ४० वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉ. विनीता वैजवाडे राहतात. २०१९ मध्ये त्यांचे विनिताशी लग्न झाले होते. या दोघांमध्ये रविवारी रात्री काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण दोघांच्या कॉमन पारिवारिक मित्रांनी सोडवले. त्यानंतर वीणा यांना राग शांत करण्यासाठी मित्राच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मग सकाळी त्या परत डॉ. गोविंद यांच्या फ्लॅटवर आल्या. सोमवारी सकाळी सहा वाजता त्यांनी पतीवर राग काढला. त्यासाठी त्यांनी स्वत:चे घरच पेटवून दिले.
गोविंद वैजवाडे यांच्या घरातून आगीचे लोट दिसत होते. यामुळे शेजारील ११ घरांनाही धोका निर्माण झाला. नागरिकांनी अग्निशमन दलास फोन केला. परंतु अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.