लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात विशेषत: पीव्हीआर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक ते गरुड चौक या रिंगरोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येत आहे. पोद्दार शाळेच्यासमोर गेली तीन दिवस कचरा जळत आहे. जाळलेल्या कच-याला भीषण आग लागली असून रिंगरोडचा परिसरात असल्यामुळे या आगीने जिवीत व वित्तहानी झाली नसली तरी वायु प्रदुषणात मात्र मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. कचरा जाळतो कोण? हेच लातूर शहर महानगपालिकेला कळत नसल्यामुळे अद्याप कोणावरही महानगरपालिकेने कारवाई केलेली नाही.
लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील कच-याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्याचे काम जनाधार सेवाभावी संस्थेला दिले आहे. शहरातून निघणा-या दररोजच्या दोनशे टन कच-याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता विभागासोबतच जनाधार या संस्थेचाही यात सहभाग घेण्यात आला आहे. मनपाच्या स्वच्छता विभागातील सुमारे ४०० कर्मचारी शहरात स्वच्छतेचे काम करीत असतात. त्या जोडीला जनाधार संस्थेचेही कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करीत असतात. जनाधार या संस्थेचे ४०० कर्मचारी शहरातील घरोघरी जाऊन ओला, सुका आणि घातक कच-याचे संकलन करतात. शहरातील रस्त्यांची झाडलोट करण्याची जबाबदारी १०० कर्मचा-यांवर आहे.
नाले सफाईच्या कामावर ७५ तर कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी ५० कर्मचारी कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात ८४ घंटागाड्या, जनधार संस्थेचे ५० ट्रॅक्टर, १३ हायवा, २५ ते ३० इतर वाहने कार्यरत आहेत. शहरातल्या शहरातच घनकच-यावर प्रक्रिया करण्याचेही प्लॉन्ट उभारण्यात आलेले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक ५, १०, ११, १३ आणि १४ मधील कच-यावर शहरातच प्रक्रिया केली जात आहे. या व्यतिरिक्त शहरातील कचरा शहरापासून जवळच असलेल्या वरवंटी कचरा डेपोवर नेला जातो व तेथे कच-यावर प्रक्रिया केली जात आहे. ओला, सुका कच-यावर काही प्रमाणात शहरातच प्रक्रिया केली जात आहे. ओल्या कच-यावर विल्ड्रो सिस्टीमने कलचर मारुन कचरा कुजवला जात आहे.
मात्र, संपूर्ण घातक कचरा वरवंटी कचरा डेपोवरच पाठवला जात आहे. वरवंटी कचरा डेपोवर वॉरियर यंत्राद्वारे कच-याचे विलगीकरण केले जात आहे. हे सर्व लातूर शहर महानगरलिकेच्या लेखी आहे. यातील बहुतांश नियोजनामध्ये सुसूत्रता राहिली नसल्याने शहरात आणि शहराच्या परिसरातील रिंगरोडवच्या कडेला कचरा जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत. रिंगरोडवरच कचरा जाळला जातो असे नव्हे तर शहरातील महानगरपालिकेचे व खाजगी व्यापारी संकुलांत दर दोन-चार दिवसांनी कच-याची होळी केली जात आहे. विशेष म्हणजे हा कचरा सर्वच प्रकारचा असतो. त्यामुळे कच-याला आग लागताच ठसका सुरु होतो. धुराचे लोळ रात्रभर उठलेले असतात. नागरिक आपापल्या घरी रात्रीच्या झोपेत असतात. परंतु त्यांच्या श्वाच्छोश्वासाद्वारे प्रदूषित हवा फुफ्फुसात जाते. त्यामुळे धाप लागणे, ठसका उठणे, छातीत जळजळ करणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. कचरा जाळणा-यांवर कोणी कारवाईही करीत नाही. नागरिकांच्या आरोग्याला वेठीस धरणा-या या प्रवृत्तीला आळा घालणे आवश्यक आहे.