मैदानाबाहेरून
पाहुणे इंग्लंडने यजमानांवर एक-झिरो अशी कसोटी मालिकेत आघाडी घेतली. या पाच कसोटी मालिकांसाठी विराट कोहलीने पूर्वीच विश्रांती घेतली आहे. पहिल्या कसोटीत राहुल लोकेशच्या मांडीचा पुढील मांसल भाग (कॉड्रीसेप्स) अवघडलेला आहे. तर रवींद्र जडेजा दुस-या डावात धावबाद झाला. तेव्हा त्याच्या मांडीतील मागील भागास (हँमस्टीग) स्ट्रेन झाल्याने कदाचित तो पुढील सर्व कसोटी खेळू शकणार नाही त्यामुळे राहुल आणि जडेजाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल.
भारतीय संघावर त्यामुळे धक्क्यावर धक्के बसत असून टीम इंडियाच्या संघामध्ये नवीन खेळाडूंना पाचारण करावे लागले. बीसीसीआयने सौरभ कुमार, सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना कसोटी संघात स्थान दिले आहे. कर्णधार रोहित शर्माला आता दुसरी कसोटी जिंकणे अत्यावश्यक झाले आहे. विशाखापट्टणम येथील खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी असेल. पहिली कसोटी तर गमावली असल्याने टीम इंडियाची क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हे एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय बुमरावर शिक्षा घोषित करण्यात आली. बुमराला बाद करण्यासाठी डिवचले होते. त्याचा फटका त्याला सामन्यानंतर बसला आहे. आयसीसीने त्याला दोषी ठरवले असून बुमरानेही गुन्हा कबूल केला आहे.
इंग्लंडच्या दुस-या डावात जसप्रीत बुमरा आणि ओली पोप यांच्यातील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला. डावातील ८२ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. षटकातील एका चेंडूवर पोप लेग बायच्या धावा घेत होता. पोप खेळपट्टीवर धावत असतानाच बॉल जसप्रीत बुमराच्या खांद्याला जाऊन धडकला. याच कारणास्तव दोघांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मध्यस्थी करून दोन्ही खेळाडूंना आपल्या मार्गाने पाठवून दिले. हा व्हीडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या वादानंतर इंग्लंडच्या डावातील १०३ व्या षटकात बुमरानेच पोपची शिकार केली. षटकातील पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. संघातील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडने जिंकल्यानंतर दुसरा सामना यजमान भारतासाठी महत्त्वाचा झाला आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर