सोलापूर — सोलापूर शहरांमध्ये माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील जे शिक्षक सरकारी अनुदानीत तुकडीवर शिक्षक म्हणून कार्य करीत असताना व सरकारी पगार घेत असताना देखील खाजगी शिकवणी घेत आहेत. अशा दुहेरी शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात यावे. असे निवेदन सोलापूर शहर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पी. टी. ए.) मार्फत माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना देण्यात आले.
अनुदानित शाळा व महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्य करीत असताना खाजगी शिकवणी घेता येत नाही. व अशी खाजगी शिकवणी त्यांनी घेतली तर ते कारवाईस पात्र आहे. व ते ज्या शिक्षण संस्थेत कार्य करतात त्या शिक्षण संस्थेवर देखील ॠ.फ. नुसार कारवाई होऊ शकते. परंतु जे शिक्षक अनुदानित शाळा व महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत असताना देखील खाजगी शिकवणी घेतात असे शिक्षक (दुहेरी शिक्षक) ज्या संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात ती संस्था या शिक्षकांवर कारवाई करीत नाही. या उलट अशा संस्था अशा शिक्षकांना (दुहेरी शिक्षकांना) पाठीशी घालत आहे. असे दुहेरी शिक्षक त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतःकडे खाजगी शिकवणी लावण्यासाठी विविध गैरमार्गांचा अवलंब करतात. व हे शिक्षक शाळा व महाविद्यालयातील पूर्ण क्षमतेने न शिकविता खाजगी शिकवणी मध्ये अधिक प्रभावी शिकवतात.
अशाप्रकारे संस्थाचालक व दुहेरी शिक्षक हे संगणमताने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत आहे. या निवेदनासोबत वरील दुहेरी शिक्षकांसंबंधीचे सर्व पुरावे सादर केलेले आहेत. या निवेदनामध्ये सोलापूर शहरातील 31 दुहेरी शिक्षकांची नावे देण्यात आली. ते शिकवत असलेले विषय व ते शिकवत असलेल्या शाळा व महाविद्यालयाचे नाव ही निवेदनात देण्यात आले. तरी येत्या 15 दिवसात या दुहेरी शिक्षक व संस्थाचालकावर योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टामध्ये दाद मागणार आणि तीव्र आंदोलन करणार आहोत. म्हणून अशा शिक्षकांविरुद्ध व अशा संस्थेविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन सोलापूर तर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल जव्हेरी, शहर अध्यक्ष शशांक भोसले, शहर उपाध्यक्ष नागेश अन्नलदास, सुनिल कामतकर, रतन अगरवाल, रवींद्र पानुगुंटी, शेखर समारंभ, गणेश कालदीप, मल्लिकार्जुन परळकर, सामलेटी, केदार, उपाध्ये, दासरी, रोहिणी पटणी, रुबिना विजापूरे यांच्यासह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.