20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी महाराष्ट्रातून मिलिंद देवरा

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून मिलिंद देवरा

पार्थ पवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत

मुंबई : राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांवर कोणाची वर्णी लागेल, याचे अंदाज बांधले जात आहेत.
एप्रिलमध्ये रिक्त होणा-या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सुनील तटकरे किंवा पार्थ पवार यांना संधी मिळू शकते. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपाची चर्चेतील नावे देखील समोर आली आहेत. भाजपाच्या यादीत दोन महिलांचा समावेश आहे.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ज्या सहा जागा आहेत, त्यातील तीन जागा सत्ताधारी भाजपाच्या ताब्यात आहेत. तर ‘मविआ’तील घटकपक्षांकडेही तीन जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याचे सूत्र सांगतात. प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्या जागी आता भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे भाजप बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आले आहे.
यामुळे राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेईल. तर अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा ब-याच काळापासून सुरू आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्यासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे.

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदारच मतदार असतात. दोन वर्षांत राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडील आमदारांची संख्या ही महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता महायुतीला पाच तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल, असा अंदाज आहे. सहापैकी पाच जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपकडून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पक्षफुटीमुळे महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान खुले असल्याने राज्यात पक्षादेश अर्थात व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. महाआघाडीत फूट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे झाल्यानंतर ही राज्यात पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीमध्ये असणा-या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यामध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचे आमदार आहेतच, त्याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांचीही ताकद असेल. सध्या असलेल्या पक्षनिहाय आमदारांच्या संख्येवरून महाराष्ट्रतील रिक्त जागांपैकी महायुतीकडे पाच आणि महाविकासआघाडीची एक जागा जाऊ शकते.

भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.

महाराष्ट्रात सहा जागा रिक्त
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा यंदा रिक्त होत असून यात सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्रराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही रिक्त होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR