22.1 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeपरभणीपरभणी मेडिकल कॉलेजमध्ये होणार थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर उपचार

परभणी मेडिकल कॉलेजमध्ये होणार थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर उपचार

परभणी : संकल्प इंडिया फाउंडेशन बेंगलोर व थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप परभणी यांचे समन्वयातून परभणी मेडिकल कॉलेज आर पी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेन्टर पाथरी रोड येथे थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेल बालकांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी डे केयर सेंटरचा शुभारंभ आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या डे केयर सेंटरमध्ये थेट बेंगलोर येथून येणा-या रूग्ण बालकांवर आरपी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर येथे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होणार आहेत.

यावेळी संकल्प इंडिया फाउंडेशनचे सीईओ राकेश धान्या, परभणी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. प्रमोद शिंदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागेश लखमावार, जेष्ठ डॉ. दत्तात्रय मगर, डॉ. रिजवान काजी, डॉ. सागर मोरे, जिल्हा लसीकरण व्यवस्थापक सौ. रेवती पिंपळगावकर, नंदू पाटिल, संदीप भंडारी, रामराव डोंगरे, करामत खान आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील थॅलसेमियाग्रस्त बालकांना सर्व अद्ययावत सुविधा परभणीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

परभणी तसेच मराठवाड्यातील बालकांना नियमितपणे उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या न परवडणा-या चाचण्या आरपी हॉस्पीटल परभणी येथे उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व पालकांच्या चेह-यावर आनंद दिसून आला व एक जगण्याची नवीन उमेद मिळाली. येत्या ५ वर्षात परभणीत थॅलसेमियाग्रस्त बालकांकरिता बोनमॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करून गरीबातील गरीब बालकांच्याही किचकट व महागडी शस्त्रक्रिया आर पी हॉस्पीटल परभणी येथे करण्याचा विश्वास देत त्यासाठी कॉलेज मार्फत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करू देणार असल्याचे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी संकल्प इंडिया फाऊंडेशनचे सीइओ राकेश धान्या यांनी परभणी मेडिकल कॉलेजमधील उपलब्ध सर्व सोयीसुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बोलतांना दिले. थॅलेसेमिया मेजर जन्म झालेल्या बालकाची वर्षानुवर्षे हीच अवस्था होती. परंतु आता आर पी हॉस्पीटल परभणी येथे आ. डॉ. पाटील यांनी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप व संकल्प इंडिया फाउंडेशनच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या डे केअर सेंटरच्या माध्यमातून पालकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने पालकांच्या चेह-यावर समाधान व आनंद दिसून आला असल्याचे राकेश धान्या म्हणाले. थॅलसेमिया मुक्त परभणी जिल्हा हे अभियान प्रभावीपणे राबवून २०२५ नंतर परभणी जिल्ह्यात थॅलेसेमिया मेजर बालकांचा जन्म होऊ नये याकरिता जनजागृती अभियानावर भर देणे गरजेचे असल्याचे धान्या यांनी सांगितले.

जनसामान्यांना ह्या रक्ताच्या गंभीर अनुवांशिक आजाराची माहिती देवून थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येऊ नये ह्या करिता तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. थॅलेसेमिया मुक्त भारत हे स्वप्न पाहून त्यासाठी गेल्या ९ वर्षांपासून अत्यंत तळमळीने काम करत असलेल्या लक्ष्मीकांत पिंपळगावकर परिवाराचा या प्रसंगीक सपत्नीक सत्कार आ. डॉ. राहुल पाटील यांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश अब्दागिरे व आरोग्य विभाग प्रमुख राहुल कांबळे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR