21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्र छ. संभाजीनगरमध्ये ओबीसी एकवटणार

 छ. संभाजीनगरमध्ये ओबीसी एकवटणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेत्यांमध्ये धुसफूस बघायला मिळत आहे. मराठा समाजाच्या लाखो नागरिकांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत. हा आकडा ५७ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार आहे. याशिवाय सरकारने मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केल्यामुळे मराठ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

पण या निर्णयाविरोधात राज्यभरातील ओबीसी नेते एकवटत आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याआधीच या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानीदेखील याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली.

‘‘आम्ही २० तारखेला छ. संभाजीनगरला विराट स्वरूपात ओबीसींच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ’’, अशी मोठी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘‘कुणाला आरक्षण दिलंय याचा विरोध नाही. आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही. आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही लढतोय. तुम्ही आरक्षण मिळवलंत, आता आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे. त्यासाठी संभाजीनगरला २० फेब्रुवारीला सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी आम्ही मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज एकत्र यावा, आपल्या हक्काचे संरक्षण करावे, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत’’, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

‘‘मंत्रिमंडळात तुम्ही पाहताय, किती ओबीसी चेहरे आहेत. जे आहेत त्यापैकी अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उपभोगत आहेत’’, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘‘शेपूट घालून हा शब्द मुद्दाम वापरला. त्यांना सत्ता महत्त्वाची आहे, ओबीसी बांधवांचं हित महत्त्वाचं वाटत नाही. कारण त्याने शेपूट घातली आहे. कुणी लढतो आहे, तो एकटा पडणारच. पण ओबीसी समाज संघर्ष करणा-यांच्या बाजूला उभा राहील’’, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR