सांगली : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ हे आवश्यकच आहे. वृत्तपत्र विक्रेता-एजंटाच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्रीही सकारात्मक आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत बैठकीचे आयोजन करून स्वतंत्र कल्याणकारी मंडळाबाबत त्यांच्याकडे आग्रह धरू असे आश्वासन वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक ठाणेचे आ. संजय केळकर यांनी दिले.
सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, राज्यातील सलग्न संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर तर कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील २२ जिल्ह्यातील स्थानिक संघटनांचे पदाधिकारी, राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. केळकर म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेत्यांचे कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, कष्ट व मिळणारे उत्पन्न याचा विचार करता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आवश्यक आहे. ते होईपर्यंत मी पाठपुरावा करणारच. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे खास बैठक लावू. तोपर्यंत राज्य शासनाच्या विविध योजनांचा विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, संघटनेच्या सर्वच पदाधिकार्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक शहरात सेंटर शेडसाठी स्थानिक आमदारांनी मदत करावी आवश्यक तेथे मी मदत करेन असे सांगितले.
अध्यक्ष पाटणकर म्हणाले, कमिशन, पुरवणी भरणावळ अशा विषयांवर स्थानिक संघटनांना प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावावेत. आवश्यक तेथे राज्य संघटनेशी संपर्क साधावा. राज्य संघटनेने घेतलेल्या सर्व निर्णयांची स्थानिक संघटना व राज्य संघटना पदाधिकार्यांनी समन्वय साधत ताकदीने अंमलबजावणी करावी असे सांगितले. कार्याध्यक्ष पवार यांनी सांगितले, संघटनेने सभासद नोंदणीसाठी स्वतंत्र अॅप सुरू केले आहे. राज्यातील सर्व विक्रेता-एजंटांनी आपली सभासद नोंदणी तातडीने करावी. राज्य संघटनेच्या सतत संपर्कात रहावे. नियमितपणे जिल्हा व विभागवार बैठका व्हाव्यात. ३१ मार्च अखेर सर्वांनी आपली ऑनलाईन सभासद नोंदणी पूर्ण करावी असे सांगितले. आभार सचिन चोपडे यांनी मानले.