अॅड. मनोहरराव गोमारे
साहित्यनगरी, लातूर :
कौशल्य विकासाच्या नावाखाली विज्ञानाला नाकारणारे नवे शैक्षणिक धोरण समाजात विषमता निर्माण करणारे असल्याने त्याला थोपविण्याची जबाबदारी समस्त समाजाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.ऋषिकेश कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने प्रा. ऋषिकेश कांबळे आपले विचार व्यक्त करत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे मुख्य संयोजक कालिदास माने, ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे, ज्येष्ठ कवी योगीराज माने, महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे, प्रा. गोविंदराव घार, प्रभाकर कापसे, अभंगराव बिराजदार, प्रा. यु. डी. गायकवाड, ब्रिजलाल कदम, संजय आलमले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष या नात्याने उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. ऋषिकेश कांबळे पुढे बोलताना म्हणाले, आता नव्याने अंमलात आणला जाणारा सन २०२० चा शिक्षण मसूदाही कौशल्य विकासाच्या नावाखाली समाजात विषमता वाढवणारा आहे. नवे शैक्षणिक धोरण अन्यायकारक असून त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत जाऊही शकणार नाही. जुन्या काळात उत्तम संस्काराची बूज राखण्याचे काम शिक्षक करत असत. शिक्षक हे संस्कृती, समाज, राष्ट्र – आदर्शांचे शिल्पकार असतात. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत शिक्षकांची जबाबदारी वाढणार असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक संयोजक कालिदास माने यांनी केले.