नागपूर : राज्यातील वाढती बेरोजगारी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक भांडवल या अभावी अनेक युवक रेल्वेस्थानक परिसरात आणि रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटली तसेच सिगारेट, गुटखा व तत्सम पदार्थ अनधिकृतपणे विक्री करू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे शयनयान डब्यातील प्रवासात सिगारेट, गुटखा, खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रेत्यांचा त्रास वाढला असून प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे सुरक्षा दलाने राबलेल्या मोहिमेत गेल्या वर्षभरात तीन हजार ३,६९३ अशा विक्रेत्यांना अटक केली.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पाणी आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी रेल्वेची यंत्रणा आहे. इंडियन रेल्वे कॅटंिरग आणि टुरिझम कॉर्पोशन (आयआरसीटीसी) तर्फे ही सेवा दिली जाते. याशिवाय विभागीय पातळीवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवाने दिले जातात. रेल्वेत विडी, सिगारेट, गुटखा, गांजा यासारखे पदार्थ विकण्यास बंदी आहे. पण, हे पदार्थ रेल्वेगाड्यांमध्ये छुप्या पद्धतीने मिळत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी बेरोजगारी हे प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे.
पदवीधर बेरोजगार सर्वाधिक
महाराष्ट्र सरकारच्या २०२२-२३ च्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालातील तपशिलानुसार राज्यात पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १० ते १२ टक्के आहे. राज्यात २०१८-१९ मध्ये ग्रामीणमध्ये ४.२ टक्के, शहरी भागात ६.३ टक्के आणि २०२०-२१ मध्ये मध्ये ग्रामीण भागात २.२ टक्के आणि ६.५ टक्के बेरोजगारीचा दर होता.