नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नारीशक्तीचा गौरव केला. तसंच विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी हलकल्लोळ आणि गोंधळ घालू नये असंही आवाहन त्यांनी केलं.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तसंच गुरुवारी निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प पटलावर ठेवतील. नारीशक्तीच्या साक्षात्काराचं हे पर्व आहे. मी आशा करतो की मागच्या दहा वर्षात ज्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने संसदेत प्रत्येकाने कार्य केलं. आज मी हे सांगू इच्छितो की ज्यांना दंगा घालण्याची सवयच झाली आहे, जे धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करतात अशा खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं. असंही मोदी यांनी म्हटले आहे.
विरोधाचा स्वर तिखट असला, आमच्यावर कितीही टीका झाली तरीही विरोधकांनी जर चांगले आणि योग्य मुद्दे मांडले तर, आपल्या बोलण्यातून ज्यांनी चांगले विचार मांडले त्यांना लोक स्मरणात ठेवतात. आमच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिली असेल तरीही देशातला एक मोठा वर्ग लोकशाहीच्या या मार्गाने केलेल्या टीकेचंही स्वागत करतो. मात्र लोकशाहीची मूल्यं बाजूला सारणं, तसंच गोंधळ घालणं ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी माफी मागण्याची वेळ आली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की निवडणूक जवळ आली असेल तर पूर्ण बजेट सादर होत नाही. फक्त अंतरिम बजेट सादर होतं. आम्हीही ती परंपरा कायम ठेवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. जनतेच्या आशीर्वादाने तो आणखी उंचावेल असा मला विश्वास आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.