नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४ चे अंतरिम बजेट लोकसभेत सादर केले. या बजेटवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून आजच बजेट म्हणजे विकसित भारताची गॅरंटी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या बजेटसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी म्हणाले, आजचे हे बजेट इनोव्हेटिव्ह आहे. यामध्ये सातत्याचा आत्मविश्वास आहे. हे बजेट विकसित भारताचे चार स्तंभ युवक, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सशक्त करणारे आहे. निर्मला सितारामन यांचे हे बजेट देशाच्या भविष्याच्या निर्मितीचे बजेट आहे. या बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी आहे. मी निर्मला सितारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. दरम्यान, बजेट मांडताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, आपल्या गरीब, महिला, युवा, अन्नदाता या चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे. या चार वर्गाच्या इच्छा-आकांशा यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे.
त्याचबरोबर विकसित भारताचे व्हिजन साकार करण्यासाठी राज्यात अनेक विकास आणि विकास सक्षम सुधारणांची गरज असल्याचेही सीतारामन यांनी म्हटले आहे. राज्य सरकारांद्वारे याच्याशी संबंधित सुधारणांना घडवून आणण्यासाठी ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्ज म्हणून ७५,००० कोटी रुपयांची तरतूद यावर्षी प्रस्तावित आहे असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.