वाराणसी : जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या तळघराला ‘व्यास जी का तहखाना’ म्हणून ओळखले जाते. बुधवारी न्यायालयाने पुजेसाठी परवानगी दिल्यानंतर काही तासातच संध्याकाळी पूजा करण्यात आली. यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. व्यासजी का तहखाना येथे दिवसात पाच वेळा आरती करण्यात येणार आहे. पहाटे ३:३०, दुपारी १२, सायंकाळी ४, संध्याकाळी ७ आणि रात्री १०:३० वाजता तळघरात आरती करण्यात येणार आहे, असे विष्णू शंकर जैन म्हणाले.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासनाने त्वरित काम केल्यामुळे मुस्लिम समुदायाच्या बाजूने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासन आणि याचिकाकर्ते यांचे संगनमत होते. मशीद समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.