लातूर : प्रतिनिधी
उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार व व्यवसायाभिमुख कर्ज सहज मिळण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर होवून समृध्द जिवनाची वाटचाल करु शकतील, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.
ग्रामपंचायत स्तरावर १५ वा वित्त आयोगातून आरोग्य, शिक्षण व उपजीविका या सदरांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा चालू आहेत. त्याअंतर्गत लातूर तालुक्यातील कृष्णा नगर ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणास जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी प्रशिक्षण कार्यशाळेस भेट देवून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम गोडभरले, सरपंच सौ. लिंबाबाई ज्ञानोबा जाधव आदी उपस्थित होते.
उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे महिला लाभार्थीना रोजगार मिळण्यास मदत होईल व उद्योजक विकास प्रशिक्षणामुळे व्यवसायाभिमुख कर्ज सहजरित्या महिलांना उपलब्ध होवू शकणार आसल्याचे सांगून सागर म्हणाले की, शासनाने या योजना राबवून योजलेले उदिष्ट साध्य होवून या कल्याणकारी योजना यशस्वी होवू शकतात असे त्यांनी सांगीतले. यावेळी गिरी म्हणाले की, प्रशिक्षणानंतर घेतलेल्या प्रमाणपत्राआधारे बँकेकडुन ५ लक्ष रु. पर्यंत मुद्रा लोन मिळु शकेल. तसेच खाजगी कंपनीत नोकरीची संधीही प्राप्त होऊ शकेल, असे त्यांनी सागीतले. यावेळी तुकाराम भालके यांनीही कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार सरपंच सौ. लिंबाबाई ज्ञानोबा जाधव यांनी मानले.