ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर ठाण्यात छोटीशी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही लेजर शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांनी त्यांना १ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री सातत्याने दौरे, दिवसभरातील व्यस्त कार्यक्रम यामुळे राज्यभरात फिरतीवर असतात. नुकतेच शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी ते विट्याला गेले होते. त्यानंतर शुक्रवारी ते ठाणे येथे आले. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर लेझरने उपचार करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असून तिथूनच ते महत्त्वाचे कामकाज सुरू ठेवणार आहे.