किव्ह : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. छोटासा देश आहे, किती वेळ टिकेल? अशा सर्व प्रश्नांना तिलांजली देत युक्रेन अजूनही रशियाला तेवढ्याच जोमाने प्रतिकार करत आहे. या सगळ्यात रशियासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात रशियाची एक मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली होती. मात्र ही दुर्घटना नसून, आपण केलेल्या हल्ल्यात ही नौका नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. डिफेन्स ऑफ युक्रेनच्या एक्स हँडलवरून या हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजाचं नाव ‘इव्हानोव्हेट्स’ असं होतं. या गाईडेड मिसाईल शिपवर सुमारे ४० रशियन सैनिक होते. युक्रेनच्या हल्ल्यानंतर ही नौका पलटली आणि एका रात्रीतच समुद्रात पूर्णपणे बुडून गेली होती.
ही युद्धनौका सुमारे ६० ते ७० मिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीची होती, असं युक्रेनच्या सुरक्षा दलांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच, त्यांनी आपल्या सैनिकांना शाबासकी देखील दिली आहे. दरम्यान, रशियाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.