पुणे : प्रतिनिधी
राज्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय असलेल्या ‘सहकारमहर्षी’ या ग्रंथास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने एका समारंभात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. सहकार भारतीच्या वतीने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून ‘सहकार सुगंध’द्वारे प्रकाशन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते ‘सहकार सुगंध’ मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी हा विशेष पुरस्कार स्वीकारला.
सन्मानपत्र, रोख रक्कम आणि श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे सहकार्यवाह अविनाश चाफेकर, कार्यवाह अरविंद नवरे, लेखक डॉ. उदय कुलकर्णी, इस्कॉन संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण २४ ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
सहकारमहर्षी ग्रंथात १५० पेक्षा अधिक महर्षींच्या कार्याचा सचित्र परिचय देण्यात आला आहे. हा ग्रंथ एकूण ९०० पानांचा असून लवकरच या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होणार आहे.