28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत

राज्यात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत

राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यास गुन्हे वाढणारच, अशी टीका केली आहे. संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले.

महेश गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार धक्कादायक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या राजवाटीत गुंडांची पैदास सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार केला असे, गणपत गायकवाड यांचे वक्तव्य आहे. महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

कायदा-सुव्यवस्था धाब्यावर अन् गुंड डोक्यावर – शरद पवार गट
याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भाजप संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि नेतेच जर अशी गुंडगिरी करणार असतील, तर जनतेने स्वत:चे संरक्षण कोणाकडून अपेक्षित करावे? या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसवले आहे, हेच या प्रकरणावरून दिसत असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

गँगवॉर सरकारकडून राज्याची बदनामी : सुप्रिया सुळे आक्रमक…
‘राज्य भरडले जातेय, आपण वर्दीचा मान ठेवणारे लोक आहोत. पोलिस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलिस आम्हाला हक्क मिळवून देतील. मात्र, दिवसाढवळ्या भांडणे होतात आणि आमदारांची हिम्मत कशी होते?, फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR