26.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रराजकारणात निष्कलंक राहिलेल्या नेत्याचा उचित गौरव

राजकारणात निष्कलंक राहिलेल्या नेत्याचा उचित गौरव

अडवाणींना ‘भारतरत्न’; राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्पुरी ठाकूर यांच्या १००व्या जयंतीनिमित्त कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, राजकारणात निष्कलंक राहिलेल्या नेत्याचा उचित गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दोन्ही नावे, त्यांची निवड योग्य : शरद पवार
दोन्ही नावे, त्यांची निवड योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी आपले योगदान दिले आहे. मी मुख्यमंत्री असताना ते बिहारचे मुख्यमंत्री होते. साधे आणि विनम्र होते. त्यांची निवड योग्य आहे. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्षे होते. एखाद दुसरा सोडला तर त्यांचा पराभव झाला नाही. रथयात्रा काढल्यानंतर काही घटना घडल्या. मात्र त्यांचे जीवन हे आदर्श असे होते. त्यांची निवड होण्याला उशीर झाला. मात्र मी त्यांचे अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले.

भाजपच्या वैचारिक जडणघडणीमध्ये अडवाणींचा खूप मोठा वाटा : विनोद तावडे

आनंद होणे स्वाभाविक आहे. लालकृष्ण अडवाणींना आम्ही जवळून पाहिले आणि अनुभवले आहे, म्हणजेच एक व्यक्ती म्हणून मी त्यांना पाहिले आहे. भाजपची वैचारिक जडणघडण करण्यामध्ये अडवाणींचा खूप मोठा वाटा आहे. आज दिनदयाळ यांच्यानंतर त्यांचा नक्कीच वाटा होता. राजकारणामध्ये राहून देखील कसे आदर्शपणे राजकारण करता येते याची त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. हिंदुत्ववाद म्हणजे याच्या विरोधात, त्याच्या विरोधात असे नसून, तो एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असल्याचे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात लोकांपर्यंत पोहोचवले असल्याचे विनोद तावडे म्हणाले.

अडवाणी सर्वांसाठी प्रेरणास्रोत : देवेंद्र फडणवीस
आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना भारताचा सर्वोच्च सन्मान, ‘भारतरत्न’ घोषित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. देशाच्या विकासात तुमचे योगदान अविस्मरणीय आहे. आपल्या सर्वांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्री राम मंदिर चळवळीसाठी तुमचा संघर्ष सदैव स्मरणात राहील. तुमचे संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित होते आणि तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

रामभक्तांसाठी अभिमानाची बाब : चंद्रशेखर बावनकुळे
या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ देण्याची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा अत्यंत आनंददायी व सुखद आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव होणे ही माझ्यासह प्रत्येक भारतीय व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणी यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची आहे. आदरणीय अडवाणी यांना ‘भारतरत्न’ घोषित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार, असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

राजकारणात निष्कलंक राहिलेल्या नेत्याचा उचित गौरव : अतुल भातखळकर
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाला, ही माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब आहे. अयोध्येत साकारलेले राम मंदिर म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या स्वप्नांची पूर्तता. अडवाणी नसते तर हे स्वप्न कधीच प्रत्यक्षात आले नसते. प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही निष्कलंक राहिलेल्या या नेत्याचा मोदी सरकारने उचित गौरव केला आहे. माननीय अडवाणीजींचे मनापासून अभिनंदन. भारत माता की जय, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

तर अधिक आनंद झाला असता : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अडवणी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. अडवाणी हे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलोय. अतिशय सुसंकृत नेते म्हणून पाहत असताना त्यांना भारतरत्न मिळाला आहे. मला सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि वाजपेयी यांची आठवण येते. आज अडवाणी यांना भारतरत्न मिळाला याबद्दल हार्दिक अभिनंदन करते. अडवाणी यांचे कौतुक उशिरा का होईना होतंय. आधीच हा पुरस्कार दिला असता तर आम्हाला निश्चितच आनंद झाला असता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचा वाटा : राज ठाकरे
करोडो भारतीयांचे आणि अनेक पिढ्यांचे, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झाले, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता, असंही राज यांनी म्हटले आहे. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणा-या या ज्येष्ठ नेत्याचे या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR