लातूर : प्रतिनिधी
एखाद्या परीक्षेत आलेले अपयश हे आयुष्यातील अंतिम अपयश नसते. कारण आयुष्यात आपणास अनेक परीक्षा द्याव्या लागतात.त्यातील एखादी परीक्षा ही संपूर्ण आयुष्य ठरवणारे नसते असे मत लातूर विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी व्यक्त्त केले. ते येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी न बनता सर्वांगीण विकसित व्हावे हे सांगितले. महाविद्यालयातून आज पर्यंत प्रगतीपथावर राहिलेले व यशस्वी झालेले विद्यार्थी हे सामान्य असतांनाही त्यांनी प्रगती साधल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणा-या विविध उपक्रमाची माहिती दिली.
प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक हरिश्चंद्र मोगरगे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. दादासाहेब लोंढे यांनी मनोगत व्यक्त्त केले. आभार प्रा. सीमा पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सविता यादव यांनी केले. या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.