मुंबई/ठाणे : प्रतिनिधी
बिहारच्या हिंसक राजकारणाची चर्चा नेहमी होते; पण बिहारलाही लाजवणारी घटना आज मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घडली. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार करून खळबळ उडवून दिली. महेश गायकवाड व राहुल पाटील हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर आ. गायकवाड यांना न्यायालयाने ११ दिवसांची पोलिस कोठडी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आणले असून ते उद्धव ठाकरेंप्रमाणे भाजपालाही धोका देतील, असा आरोप करताना आ. गायकवाड यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आ. गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात जमिनीचा वाद आहे. हा वाद मिटवण्यासाठी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही नेत्यांना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. या वेळी आ. गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली व वरिष्ठ पोलिस अधिकारी महेश जगताप यांच्या समोरच गणपत गायकवाड आणि त्यांचा अंगरक्षक हर्षल केने यांनी आपल्या जवळच्या बंदुकीतून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. महेश गायकवाड यांच्या पोटात ४ गोळ्या लागल्या असून त्यांचे सहकारी राहुल पाटील यांनाही एक गोळी लागली आहे. महेश गायकवाड यांना तात्काळ ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान आ. गणपत गायकवाड व अन्य तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
…तर महाराष्ट्रात गुंडाराज
येईल : आ. गायकवाड
आ. गायकवाड यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना गोळीबाराचे समर्थन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलिस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुले जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्हाचा मला अजिबात पश्चाताप होत नाही, असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
फडणवीस यांच्यावर नाराजी
माझ्यावरील अन्यायाची माहिती मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा दिली होती; परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. पक्षश्रेष्ठींनी माझी दखल घेतली नाही. १० वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागा मालकांना पैसे देऊनही ते सह्या करण्यास येत नव्हते. त्यानंतर आम्ही न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. केस जिंकून ज्या वेळी सातबारा आमच्या नावावर झाला, त्यावेळी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला.
सत्तेचा गैरवापर, पवारांची टीका
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली. सध्या सत्तेचा प्रचंड गैरवापर केला जातोय. गोळीबाराची घटना होऊनही राज्य सरकार त्या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे, त्याचे एक उदाहरण आहे. राज्यात अशा गोष्टी घडतायेत ते महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असे शरद पवार म्हणाले.
कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर खरमरीत टीका केली. मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हागारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मी विधिमंडळ अधिवेशनातही बोललो होतो. पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरूच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलिस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे, असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधूसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ नये, ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा? असा सवाल त्यांनी केला. सर्वसामान्य लोक पोलिस स्टेशनमध्ये न्याय मिळेल या विश्वासाने जातात. तेथे पोलिसांसमोर गोळीबार करण्याची आमदारांची हिम्मत कशी होते? असा सवाल करताना राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सध्याच्या सरकारमध्ये गुंड प्रवृत्तीला पोसण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सत्ताधारी आमदार जर पोलिस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील तर या राज्यातील जनतेनं कोणाकडे बघायचं? या लोकांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचा युपी, बिहार करून ठेवला आहे.
राऊतांचा हल्लाबोल
गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात. आता गृहमंत्री फडणवीस कुठे आहेत? नागपूर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणूक ज्ंिकण्यासाठी गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण दिलं जातं आहे. महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरलं आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. गणपत गायकवाड आज जे बोलले तेच आम्ही वर्षभर सांगत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगारांच्या टोळ्यांना कसे फोन केले जात आहेत ते सांगितलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढलं गेलं आहे. मी सगळ्यांची नावंही देऊ शकतो. हे सगळं केवळ राजकारणासाठी सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.