हैदराबाद : झारखंडमधील चंपई सोरेन यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि स्वतःच्या आमदारांना कडेकोट बंदोबस्तामध्ये तेलंगणमधील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या रिसॉर्टमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे तिथे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील वेगळी ठेवण्यात आली असून खोल्यांच्या बाहेर पोलिसांचा पहारा आहे. सध्या सत्ताधारी पक्षाच्या ४० आमदारांचा मुक्काम हा शमीरपेट येथील लिओनिया रिसॉर्टमध्ये आहे. दोन विशेष विमानांतून त्यांना शुक्रवारीच येथे आणण्यात आले होते.
सध्या या आमदारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस दीपा दास मुन्शी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशिवाय अन्य कुणालाही भेटण्यास या आमदारांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्या मजल्यावर या आमदारांचा मुक्काम आहे तिथे अपरिचित व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या मजल्यावरील मुख्य प्रवेशद्वारावर चोवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आमदारांच्या भोजनाची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली असून तिथे कुणालाही प्रवेश नाही. भाजपचे नेते या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात ही शक्यता लक्षात घेऊनच येथे बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. या रिसॉर्टच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाजप आमदारांनाही निर्देश
चंपई सोरेन यांच्या सरकारची पाच फेब्रुवारीला बहुमत परीक्षा होणार असून त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या आमदारांना रांचीमध्येच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. काही आमदार हे ऐनवेळी पक्षाला दगा देण्याची भीती वर्तविली जात आहे. काँग्रेसच्या गोटातील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पक्षश्रेष्ठी सावध झाले आहेत.
हेमंत सोरेन विधिमंडळात येणार
विशेष न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सोमवारी होऊ घातलेल्या बहुमत चाचणीवेळी विधिमंडळात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी सोरेन यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले होते. चंपई सोरेन यांच्या बहुमत चाचणीप्रसंगी आपल्याला विधिमंडळात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जावी अशी विनंती हेमंत सोरेन यांनी केली होती. न्यायालयाने त्याला मंजुरी दिली आहे.