नवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक समितीला क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे. या निलंबनामागे अनेक कारणे देण्यात आली असून त्यात समितीच्या निवडणुकीतील अनियमितता आणि क्रीडा निर्देशांचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
पीसीआय कार्यकारी समितीचा कार्यकाळ ३१ जानेवारी रोजी संपणार होता. नवीन कार्यकारिणीच्या निवडणुका २८ मार्च २०२४ रोजी होणार आहेत, म्हणजेच मागील कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. हा विलंब ढउक च्या स्वत:च्या घटनेतील तरतुदी आणि क्रीडा निर्देशांचे उल्लंघन करणारा आहे. क्रीडा मंत्रालयाने २०१५ मध्ये एक परिपत्रक जारी करून सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना त्यांच्या पदाधिका-यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी किमान एक महिना आधी नवीन पदाधिका-यांसाठी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र पीसीआय या परिपत्रकाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप क्रीडा मंत्रालयाने केला.
पीसीआयच्या स्वत:च्या घटनेत दर चार वर्षांनी गव्हर्निंग बॉडी सदस्यांच्या निवडीबद्दल देखील सांगितले आहे. पुढे, हे स्पष्ट करते की निवडणूक प्रक्रिया भारत सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, २०११ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असावी.