सेलू : अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये उभारण्यात आलेले राममंदिर ही वास्तू नसून देशाचा आत्मसन्मान असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले आहे. स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल व देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या वतीने आयोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना शनिवार, ,दि.३ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, आ. मेघना बोर्डीकर, नूतन शिक्षण संस्थेचे सचिव विनायकराव कोठेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, विवेकानंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील नूतन विद्यालय सभागृहात राममंदिर ते रामराज्य या विषयावर बोलताना देवधर म्हणाले की, रामराज्य काय आहे? आणि कशामुळे येत आहे? रामजन्मभूमी आंदोलन कशासाठी उभारण्यात आले? भव्य दिव्य राममंदिर कशासाठी उभारले? या सर्व प्रश्नांची उकल करताना अयोध्या, ही प्रभु श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असल्याकारणाने तेथे राजा विक्रमादित्यांनी भव्य मंदिर उभे केले होते.
मात्र बाबरने देशावर आक्रमण करून देशात सत्ता प्रस्थापित केली. देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासाला तडा देण्याच्या हेतूने राममंदिर तोडले. त्यामुळे देशातील साधु संतांनी जन्मभूमीच्या जागेवरच पुन्हा मंदिर उभारण्यासाठी लढा सुरू केला. साधूसंत त्याच परिसरात छावण्या उभारून राहू लागले. दरम्यानच्या काळात विश्व हिंदू परिषदेने कुलूप उघडा आंदोलन केले आणि दर्शन सुरू झाले. जिथे अपमान झाला आहे त्याच ठिकाणी परिमार्जन होऊ शकते. म्हणुनच विश्व हिंदू परिषदेने मंदिर वही बनायेंगे नारा देत प्रभु श्रीरामचंद्रानांच आश्वासन दिले. दरम्यान शिलान्यास, कारसेवा, सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा यामुळे जनजागृती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी भव्यदिव्य मंदिरात प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून संपूर्ण देशवासीयांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून दिला आहे असे देवधर यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना किशोर शितोळे यांनी स्व.जनुभाऊ रानडे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कु.शालवी सावरगावकर व संच यांनी स्वागतगीत सादर केले .कु.कल्याणी पाठक हिने विराजे रघुनंदन एकबार गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय उपेंद्र बेलुरकर यांनी दिला. प्रास्ताविक हरिभाऊ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी तर श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी स्व.जनुभाऊ रानडे संयोजन समिती, देवगिरी बँक व स्वामी विवेकानंद विद्यालयातील पदाधिकारी व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला होता.