पुणे : आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. पुणे शहरातील गुंड श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना फोटोत दिसत आहे.
खासदार संजय राऊत यांनीसुद्धा हा फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील हा गुंड कोण? याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली. हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणा-या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अनिकेत जावळकर यांच्याबरोबर वर्षा निवासस्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. गुंड हेमंत दाभेकर हा किशोर मारणे याच्या खून प्रकरणात शरद मोहळ याच्यासोबत शिक्षा भोगत होता. हेमंत दाभेकर याच्यावर खून, अपहरण, खंडणी, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.