चंदिगड : हरियाणामध्ये एका मोठ्या सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश झाला. एक-दोन नव्हे तर सुमारे ८०० लोक याचे बळी ठरले आहेत. हरियाणा पोलीस ३७ लाख रुपयांच्या सेक्सटॉर्शनचा तपास करत होते. या तपासादरम्यान पोलिसांना एका मोठ्या रॅकेटची माहिती मिळाली. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून हे लोक अश्लील व्हिडिओ दाखवून लोकांना ब्लॅकमेल करायचे. भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी, सेक्टर १३, भिवानी येथे राहणा-या एका वृद्धाने याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्यांना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला होता. फोन उचलल्यावर एका मुलीने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. त्या वृध्दाने कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर काही वेळाने त्यांना एक व्हिडिओ पाठवण्यात आला ज्यामध्ये वृध्द व्यक्ती नग्न मुलीच्या जागी दिसत होता. त्यानंतर त्यांना सतत फोन येऊ लागले. फोन करून आरोपी स्वत:ला सीबीआय किंवा दिल्लीच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सांगत होते. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी दिली.
वृद्ध व्यक्तीने आरोपींना दोन दिवसांत ३६.८४ लाख रुपये दिले. यानंतर आरोपींनी आणखी २० लाखांची मागणी सुरू केली. त्यानंतर वृध्द व्यक्तीने संपूर्ण हकीकत घरात सांगितली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मोबाईल फोन ट्रेस केला असता तो राजस्थानचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ८ जणांना अटक करण्यात आली. सायबर तपासणीसाठी १९ मोबाईल पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.