बागपत : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरनावा येथे असलेल्या पांडवांच्या लक्षगृहाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या ५३ वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे.
लक्षगृह आणि मजारचा मालकी हक्क आता हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. हे प्रकरण १९७० मध्ये मेरठच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी सध्या बागपत जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे.
बागपत दिवाणी न्यायाधीश शिवम द्विवेदी यांनी १९७० मध्ये सुरू झालेल्या खटल्यात हा निकाल दिला आहे. बरनावा येथील रहिवासी असलेल्या मुकीम खान यांनी वक्फ बोर्डाच्या अधिका-याच्या भूमिकेत मेरठच्या सरधना कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये त्यांनी लक्षगृहाच्या गुरुकुलाचे संस्थापक बह्मचारी कृष्णदत्त महाराज यांना प्रतिवादी केले होते. या परिसरावर मुकीम खान यांनी वक्फ बोर्डाच्या मालकी हक्काचा दावा केला होता.
मुस्लीम पक्षाने न्यायालयात अपील दाखल केले असता त्यांनी प्रतिवादी कृष्णदत्त महाराज हे बाहेरचे असल्याचे सांगितले. मुस्लीम पक्षाने असेही म्हटले होते की, कृष्णदत्त महाराजांना मुस्लिम स्मशानभूमी नष्ट करुन हिंदूंचे तीर्थक्षेत्र बनवायचे आहे. विशेष म्हणजे, हिंदूंच्या बाजूने पुरावे सादर करणारे आणि मुस्लीम बाजूने खटला दाखल करणारे मुकीम खान आणि कृष्णदत्त महाराज, या दोघांचेही निधन झाले आहे. त्यांच्या जागी इतर लोक कोर्टात केस लढवत होते.
हिंदू संस्कृतीचे जुने पुरावे सापडले
लक्षगृह आणि मजार-कब्रस्तान वादात एकूण १०८ बिघे(अर्धा एकर) जमीन आहे. सध्या न्यायालयाच्या निर्णयानंतर या जमिनीची संपूर्ण मालकी हिंदू बाजूकडे राहणार आहे. येथे पांडवकालीन एक बोगदादेखील आहे, ज्याद्वारे पांडव लक्षगृहातून बाहेर निघून गेल्याचा दावा केला जातो. याबाबत इतिहासकारांचे मतही घेण्यात आले आहे. या प्रकरणी इतिहासकार अमित राय म्हणाले होते की, या भूमीवर केलेल्या उत्खननात हिंदू संस्कृतीचे हजारो वर्षे जुने पुरावे सापडले आहेत.