नागपूर : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये हिंसाचार घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. या दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, गोंदिया आणि नागपूरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी शहरी नक्षलवादी कट रचत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
शहरी माओवादाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. बॅन असलेल्या युनायटेड फ्रंटच्या विंगने शहरी भागात संघटन करायला सुरुवात केली असून काही लोक विशिष्ट शहरांमध्ये पाठवले आहेत. त्यांच्या माध्यमातून शासनाविरोधात रोष निर्माण करण्यासाठी हिंसाचार घडवला जावू शकतो.
या लोकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये तरुणांचा समावेश केला जातो. अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. सर्व शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणेला अलर्ट करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.