नवी दिल्ली : लोकसभेत सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुस-या कार्यकाळातील शेवटच्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. माझ्या तिस-या टर्ममध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की १० वर्षांच्या शासनाचा अनुभव, आजची मजबूत अर्थव्यवस्था आणि भारत ज्या वेगाने प्रगती करतोय, ते पाहता मी विश्वासाने सांगतो की, आमच्या तिस-या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. ही मोदींची गॅरेंटी आहे. आमची तिसरी टर्म मोठ्या निर्णयांनी भरलेली असेल. मी राममंदिर सोहळ्यात सांगितले होते की, मला पुढील हजार वर्षे देशाला समृद्धीच्या शिखरावर पाहायचे आहे. तिसरी टर्म पुढील १००० वर्षांसाठी मजबूत पाया घालण्याची असतील. संपूर्ण देश म्हणत आहे, यावेळी ४०० पार. जनता भाजपला ३७० जागा आणि एनडीएला ४०० जागा देईल.
आमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत भारत आणि नमो भारत ट्रेनने भारत प्रगतीच्या मार्गावर आला. प्रभू रामाचे मंदिर भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेला ऊर्जा देत राहील. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात ते (विरोधक) अपयशी ठरले. आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस सरकार या गतीची कल्पनाही करू शकत नाही. आम्ही गरीबांसाठी ४ कोटी घरे आणि शहरी गरिबांसाठी ८० लाख पक्की घरे बांधली. काँग्रेसच्या गतीने ही घरे बांधली असती, तर एवढे काम पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती.
सरकारने अनेक योजना सुरू केल्या
करप्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटीसारखे निर्णय घेण्यात आले. जनतेने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि दुस-या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त आशीर्वाद दिले. दुसरी टर्म म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेची मुदत होती. देशाच्या ताकदीवर आमचा विश्वास आहे. आमचा लोकांच्या शक्तीवर विश्वास आहे. देशातील जनतेने आम्हाला पहिल्यांदा सेवेची संधी दिली, तेव्हा आम्ही यूपीएने केलेली पोकळी भरुन काढली. दुस-या टर्ममध्ये नव्या भारताचा पाया रचला. उज्ज्वला, आयुष्मानसह अनेक योजना सुरू केल्या. महिला शक्ती, युवा शक्ती, देशातील गरीब बंधू-भगिनी आणि शेतकरी, ज्यामुळे विकसित भारताचे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांनी धैर्य गमावले
मी पाहतो की तुमच्यातील अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याचे धैर्य गमावले आहेत. मी ऐकले आहे की, अनेक लोक त्यांच्या जागा बदलण्याचा विचार करत आहेत. अनेकांना आता लोकसभेऐवजी राज्यसभेवर जायचे आहे. विरोधकांच्या या अवस्थेला काँग्रेस जबाबदार आहे. देशाला निरोगी आणि चांगल्या विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. काँग्रेसमध्ये इतर कोणत्याही नेत्याचा प्रचार झाला नाही. देशाला घराणेशाहीचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या दुकानाला टाळे लावण्याची वेळ आली. काँग्रेसच्या याच मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसने नेहमीच एकाच कुटुंबावर विश्वास ठेवला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासमोर कुणाचाही विचार केला नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.