मुंबई : जवळपास आठ वर्षांनंतर टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया या जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामने खेळणार आहे. २०१६ नंतर भारत टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
झिम्बाब्वे क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घोषणा केली. ६ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. शेवटचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.
झिम्बाब्वे दौ-यात भारतीय संघ आपले सर्व सामने हरारे येथेच खेळणार आहे. १ ते २९ जून दरम्यान होणा-या टी-२० वर्ल्ड कपनंतर ही मालिका आयोजित केली जाईल. झिम्बाब्वे क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेचा प्राथमिक उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याची भावना वाढवणे आहे.