बार्शी –
येथील सराफ दुकान फोडून १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. मध्यरात्रीच्या सुमारास तानाजी चौकातील सराफ दुकानात हा धाडसी चोरीचा प्रकार घडला. शहर पोलिसांत या चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सराफ दुकानाचे मालक भगवंत पौळ (रा. बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौळ यांचे तानाजी चौक येथे पद्मावती ज्वेलर्स हे सोन्या, चांदीचे दुकान आहे. रात्री फिर्यादीचा मुलगा अक्षय पौळ यांनी सराफ दुकान बंद केले व तो घरी आला.
पहाटे सहा वाजता नागेश प्रतापे यांनी ‘तुमच्या दुकानाचे शटर उघडे आहे, चोरी झाल्याचे दिसते’ असे फिर्यादीचा मुलगा अमित यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. यानंतर फिर्यादी व त्यांची दोन्ही मुले लागलीच तानाजी चौक येथे दुकानाकडे गेली. तेथे गेल्यानंतर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उघडल्याचे दिसले. फिर्यादीने आतमध्ये जाऊन पाहिले असताना ट्रे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तसेच लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिनेही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानांत एका बाजूला लोखंडी रॉड व टॉर्च पडली होती.
शिवाय दुकानाच्या आत लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, नेकलेस, लेडीज अंगठ्या असे एकूण १५ लाखांचे सोने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने सोलापूरहून पोलिसांचे विशेष श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. चोरीच्या घटनेनंतर पौळ यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आहे.