मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी ‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये,’ असे नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. छगन भुजबळ यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर नाभिक समाजाने आता विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, वादग्रस्त विधानानंतर छगन भुजबळ यांनी माफी देखील मागितली होती. आपण केलेले विधान हे गावापुरते होते. तर सर्वसमावेशक नसल्याचा खुलासा भुजबळ यांनी केला. मात्र हक्काची लढाई लढताना सत्तेतील नेत्यांनी दुही माजेल अशी विधाने करू नयेत, म्हणून सामान्य लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले.
भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी: मनोज जरांगेंची मागणी
छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेते असतील तर त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. माफी मागितली नाही, तर त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. ओबीसी समाजाने भुजबळांना समज द्यावी, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे हे आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत.