मुंबई : जन्मदात्या बापाचे नाव लावणे अपेक्षित असताना राजकारणात मात्र, बाप बदलण्याची नवीन पद्धत आली असल्याची टीका शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अजित दादा गटावर केली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निकाल दिला असून, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहेत. यावरून रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, ‘खरे पाहिले तर असा निकाल येणे अपेक्षित होते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला, त्या पक्षाचे चिन्ह काढण्यात आले. त्यामुळे हे माहीत होते की, आपल्या पक्षाचेही चिन्ह काढण्यात येईल. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात आणि भारतात शिल्लक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार हे आमची एकमेव ताकद आणि पक्ष आहे. पवार साहेब आमच्यासोबत असल्याने, लढेंगे भी और जितेंगे भी, असे खडसे म्हणाल्या.
जनतेचा असंतोष मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार…
सुप्रियाताईंनी सांगितले त्याप्रमाणे या सर्व निर्णयात अदृश्य शक्ती आहेच. मात्र, देशभरात जनतेमध्ये जो असंतोष आहे तो मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे. जन्म देणा-या बापाचे नाव लागले पाहिजे, जन्म देणा-या बापाचाच हा पक्ष असायला हवा, मात्र बाप बदलण्याची ही नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप….
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिल्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शरद पवार गटाकडून पक्ष चोरल्याचा आरोप केला जात आहे. तर, खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना आरोपीच्या पिंज-यात उभे करताना पाहायला मिळत आहेत.