नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी) गोकुळपुरी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर ढिगाखाली दबल्याने दोन जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा रस्ता बंद करण्यात आला आहे. अपघातानंतर या मार्गावरील मेट्रो ट्रेन सध्या एकाच मार्गावर चालवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) दिल्ली मेट्रोच्या गोकुळपुरी स्थानकावर अपघात झाला आहे. स्टेशनचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या ढिगा-याखाली अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, परंतु अद्याप कोणत्याही अधिका-याने मृत्यूची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी ११ च्या सुमारास गोकुळपुरी मेट्रो स्टेशनच्या पूर्वेकडील सीमा भिंतीचा काही भाग खाली रस्त्यावर पडला. ढिगा-याखाली एक जण अडकून गंभीर जखमी झाला आहे, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. काही लोकांच्या मदतीने पोलिस कर्मचा-यांनी ढिगा-यात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. घटनेच्या वेळी तो स्कूटरवरून जात होता. जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने ढिगारा हटवण्यात येत आहे. स्थानिक पोलिस आणि मेट्रोचे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.