मुंबई : मुंबई अंडरवर्ल्डमधील शेकडो गुन्हेगारांचा खात्मा करून देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अंधेरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचे कळते.
अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.
प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील निवासस्थानी आज दुपारी आयकर विभागाचे पथक पोहोचले. आमदारासंबंधी एका प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे. अजूनही ही कारवाई सुरू आहे.
प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलिस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादात राहिली. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध अशा आरोप प्रकरणात २००८ मध्ये प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते.
लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र २०१३ मध्ये प्रदीप शर्मा यांची मुंबई उच्च न्यायालयाने आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांमधूनही त्यांची मुक्तता करण्यात आली.
आपल्यावरील सगळ्या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा पोलिस दलात रुजू होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. काही महिने दुर्लक्ष केल्यानंतर ते पोलिस सेवेत रुजू झाले. मात्र जुलै २०१९ रोजी त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ साली मुंबईतून निवडणूकही लढले. परंतु त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.