छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ४४० आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. दरम्यान, आरोग्य विभागाला वेठीस धरू नये आणि २४ तासांत कामावर हजर होण्याची नोटीस आशा सेविकांना देण्यात आली होती. मात्र, या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल ४४० आशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आशा सेविका देखील या संपात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या ५११ आशा स्वयंसेविकाही या संपात सहभागी आहेत. मात्र, याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, आशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या आशा सेविकांनी या नोटीसची कोणतेही दखल घेतली नाही. नोटीस बजावल्यावर ५११ आशा सेविकांपैकी केवळ ७१ जणी कामावर हजर झाल्या होत्या.
आशा सेविका आपल्या मागण्यांवर ठाम…
मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या ५११ आशा स्वयंसेविका सुद्धा या संपात सहभागी झाल्या होत्या. यातील ७१ जणी कामावर हजर झाल्या आहेत. मात्र, कामावर हजर न झालेल्या महापालिकेच्या ४४० आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कारवाईनंतर देखील आशा सेविका आपल्या मागण्यांवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.