मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरी असताना बराच वेळ त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.
त्यानंतर आता त्यांना न्यूरो सर्जकडे रेफर करण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिथुन चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. या वयातही ते इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह असतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये ते ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हा त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने त्यांच्यासाठी एक खास व्हीडीओ तयार केला होता. जो व्हीडीओ पाहून मिथुन चक्रवर्ती यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. मिथुन यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या संपूर्ण बॉलिवूडमधील करिअरमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच दमदार डान्स करणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. डिस्को डान्सर अशी त्यांची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.