हिंगोली : शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांचे एक वक्तव्य पुन्हा चांगलेच व्हायरल झाले असून त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. ‘पोरांनो तुमचे आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’ असे विधान बांगर यांनी केले आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार असलेल्या बांगर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना हे वक्तव्य केले. मात्र चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने ते चर्चेत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी विधानसभेतील लाख येथील विद्यार्थ्यांसमोर आमदार संतोष बांगर बोलत होते. तेव्हा त्यांनी मुलांशी बोलताना हा अजब सल्ला दिला. ‘आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका.’ ‘ तुम्ही का जेवत नाही असे जर त्यांनी विचारले, तर त्यांना म्हणायचे आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हा जेवतो नाहीतर जेवत नाही..’ असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
त्यांच्या या संभाषणाचा, सल्ला देतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे बांगर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.