नागपूर : प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीची प्रतिके असणारी स्मारके अन् संग्रहालयांचे लवकरच रुपडे पालटणार आहे. राज्यातील अशा विविध ठिकाणांची डागडुजी आणि जतन करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ४२ तज्ज्ञ वास्तुविशारदांशी (आर्किटेक्चर) करार केला आहे.
त्यामुळे, हजारो वर्षांचा इतिहास जपणा-या या वास्तूंना लवकरच नवी झालर लागलेली पाहायला मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारीत येणारे हे संग्रहालय व स्मारक आहेत.
जतन व दुरुस्तीची कामे पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार, मूळ स्थापत्यरचना कायम ठेवून व्हावीत, संग्रहालयशास्त्रानुसार संग्रहालयाची उभारणी, विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक व्हावीत या दृष्टीने राज्य शासनाच्या या विभागाने खाजगी वास्तुविशारदकांशी करार केला आहे.
या अंतर्गत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयासह (अजब बंगला) राज्यभरातील १३ संग्रहालयांचा कायापालट होणार आहे. संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट), माती परीक्षण चाचणी (सॉईल टेंिस्टग), भूचाचणी (जिओ टेंिस्टग) तसेच संवर्धन पूर्व गरजेच्या असलेल्या सर्व चाचण्या या वास्तुविशारदकांना कराव्या लागणार आहे.
वाघनखांचेही निमित्त
लंडन येथून आणण्यात येणारी वाघनखे १६ नोव्हेंबर २०२३ ते १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राज्यातील विविध संग्रहालयांमध्ये राहणार आहेत. या निमित्त संग्रहालयांमधील वर्दळ वाढणार आहे. शिवाय, सुरक्षेचे कारणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे, राज्यातील संग्रहालयांत दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत.