25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमाध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडकेंचा पदभार कोणाकडे?

माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडकेंचा पदभार कोणाकडे?

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षण खात्यातील अधिका-यांच्या बदल्या व पदोन्नती होणार आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड व कादर शेख यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून वर्ध्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप येतील, असेही बोलले जात आहे. या ८ दिवसांत त्यासंबंधीचे आदेश निघतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्यापासून १ नोव्हेंबर २०२२ पासून या विभागाला अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. लोहार यांच्यानंतर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी तब्बल एक वर्ष या विभागाचा कारभार व्यवस्थित हाताळला. त्यानंतर महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रभारी म्हणून या विभागाचा चांगला कारभार केला.

आता तृप्ती अंधारे यांच्याकडे या विभागाचा पदभार असून त्यांच्याही कामावर विभागातील कर्मचारी खूष आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणूनही त्यांनी शालार्थ आयडी, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अशी कामे व्यवस्थितपणे पार पाडली आहेत. पण, १५ महिन्यांपासून प्रभारींवर चालणा-या या विभागाला आता लोकसभा आचारसंहितेपूर्वी पूर्णवेळ अधिकारी मिळेल, अशी आशा आहे. दरम्यान, पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सोलापूरला नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोलापूर महापालिकेचे तत्कालीन प्रशासनाधिकारी कादर शेख यांच्याकडे प्राथमिकची जबाबदारी येईल, अशीही चर्चा आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षण खात्याला बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे. कामकाज करताना प्रत्येक पावलावर येणा-या अडचणी, आजारी असतानाही रजा मिळत नसल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला होता. पण, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला आणि पुन्हा सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला. काही दिवसांतच त्यांनी कामाची झलक दाखवून देत सेवानिवृत्त कर्मचा-यांचे विषय मार्गी लावले. पण, आता ते मुलीचा विवाह असल्याने १२ ते १७ फेब्रुवारीपर्यंत रजेवर आहेत. त्यांच्या विनंती अर्जानुसार अचारसंहितेपूर्वी बदली होण्याची शक्यता आहे, पण बदली होणार की त्यांना इथेच थांबावे लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी १६ ऑक्टोबर ते जानेवारीअखेर माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार सांभाळला आहे. पण, आता त्या स्वत: पुन्हा माध्यमिकची जबाबदारी घेण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे फडके रजेवरून येईपर्यंत या विभागाचा पदभार कोणाकडे राहणार हे निश्चित झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR