अंबिकापूर : दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान छत्तीसगढच्या अंबिकापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली.
देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतक-यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची गॅरंटी देतो, असे राहुल गांधी म्हणाले. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील सर्वात मोठी मागणी ही ‘एमएसपी’ संबंधीतच आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील शेतक-यांना जे काही मिळालं पाहिजे ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत, मात्र त्यांना रोखले जात आहे. त्यांच्यावर अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. शेतकरी फक्त त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, इतकीच मागणी करत आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, शेतकरी बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. काँग्रेसने प्रत्येक शेतक-यांच्या पिकांना स्वामिनाथन आयोगानुसार एमएसपी कायदेशीर गॅरंटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने १५ कोटी शेतकरी कुटुंबांचे आयुष्य बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली गॅरंटी आहे.