24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावानेच गैरप्रकार करण्याचे प्रयत्न

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावानेच गैरप्रकार करण्याचे प्रयत्न

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिका-यांच्या बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणावर गृह विभागाकडून अधिकृत परिपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांचे बनावट ईमेल, लेटरहेड आणि सहीच्या वापरानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सर्व विभागांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय विभागांना आता जीमेल, आणि इतर खाजगी मेलचा वापर करता येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

गृह विभागाने परिपत्रकात नेमकं काय म्हटले?
‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि त्यांचे खासगी सचिवांचे बनावट ईमेल खाते तयार करून सदर ईमेल खात्याद्वारे, विद्युत विभागाशी संबंधित ६ अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला ईमेल करण्यात आले. बदली आदेशांवर उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर बनावट स्वाक्ष-या असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात अशा बाबींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मार्गदर्शक सुचनांचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्याअनुषंगाने सदर मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती’’, असे गृह विभागाने पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR