लातूर : येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील २४ बेवारस वाहनांचा भंगार भावाप्रमाणे जाहीर लिलाव १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये होणा-या या लिलावात सहभागी होण्यासाठी खरेदीदारांनी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा भरणा करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
जाहीर लिलाव करण्यात येणा-या २४ बेवारस वाहनांमध्ये १९ तीन चाकी, ३ चार चाकी आणि २ सहा चाकी वाहनांचा समावेश आहे. या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी खरेदीदारांनी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरल्यानंतर टोकन प्राप्त करुन घ्यावे. टोकन प्राप्त करुन घेणा-या खरेदीदारांनाच लिलावात बोली लावता येईल. लिलावात अंतिम बोली लावून वाहन खरेदी करणा-या खरेदीदारांना त्याच दिवशी २५ टक्के रक्कम (अनामत रक्कमेसह) रोखीने भरावी लागेल. तसेच बोलीची पूर्ण रक्कम (अनामत रकमेसह) २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस स्टेशनला जमा करुन वाहने घेवून जावी लागतील.
लिलावात विक्री केली जाणारी वाहने भंगार म्हणून विक्री केली जाणार असल्याने त्यांची नोंदणी रद्द होणार आहे. त्यामुळे ही वाहने परत वापरता येणार नाहीत किंवा आहे तशीच विक्री करता येणार नाहीत. असे आढळून आल्यास संबंधित खरेदीदारास जबाबदार धरुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. लिलावात बोलीमध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लिलाव रद्द करण्याचा किंवा दुस-या दिनांकास करण्याचा अधिकार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना राहील.