सतत विकसित होत चाललेल्या तंत्रज्ञानाने शहरी लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणलेच आहेत. परंतु आता खेडोपाडीही नवे तंत्रज्ञान बदल घडवू लागले आहे. विकसित तंत्रज्ञानाचा वापर शेतीसारख्या पारंपरिक व्यवसायातही वाढताना दिसतो आहे. जगभरातील शास्त्रज्ञ शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तसेच शेतीसाठीच्या अवजारांमध्ये आधुनिकता आणण्यासाठी संशोधनात गढून गेले आहेत. या संशोधनांचा वेग पाहता आगामी काळात शेतीचे चित्र पूर्णपणे बदलून गेल्याचे पाहायला मिळणार आहे.
ती हा व्यवसाय जगातील अनेक भागांमध्ये आजही परंपरागत पद्धतीने केला जातो. भारतातही बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच तो करतात. वस्तुत: शेती, पशुपालन हे मानवाचे सर्वांत जुने व्यवसाय आहेत. त्यामुळे आधुनिकतेचा स्पर्श इतर क्षेत्रांना ज्याप्रमाणे झाला, तसाच शेतीलाही होणे अपरिहार्यच होते. शेतीसाठी उपयोगात आणल्या जाणा-या अवजारांमध्ये बरेच बदल झाले आहेत. शेतीची अनेक कामे सध्या स्वयंचलित यंत्रांच्या साह्याने झटपट होत आहेत. गेल्या पन्नास वर्षांत शेतीत झालेले बदल पाहता पूर्वीच्या शेतीपेक्षा ती किती बदलली आहे, हे लक्षात येते. शहरात राहणा-या; परंतु गावाशी, शेतीशी संबंध असलेल्या कोणत्याही माणसाला हे बदल स्पष्टपणे दिसून येतील. शेतीतंत्रात गेल्या वीस वर्षांतच आमूलाग्र बदल झाले असून, अनेक जुनी तंत्रे लयालाही गेलेली दिसतात. यापुढील काळात शेतीचे चित्र खूपच बदलून जाणार आहे; कारण या क्षेत्रात शास्त्रज्ञ अनेक नव्या तंत्रांवर संशोधन करीत आहेत. सध्याची शेतीपद्धती आणि गरजा लक्षात घेऊन हे संशोधन केले जात असल्यामुळे आगामी २० वर्षांत शेतीचे स्वरूप पूर्णपणे बदलल्याचे दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको. शेतीबरोबरच पशुपालनाच्या क्षेत्रातही मोठे बदल अपेक्षित असून, या पारंपरिक व्यवसायांमधील कामांचे स्वरूपच बदलणार आहे.
शेती म्हटल्यावर सामान्यत: डोळ्यांपुढे जे चित्र उभे राहते,
त्यात काबाडकष्ट, माती-चिखलात हात-पाय बरबटून घेतलेला शेतकरीच आपल्याला दिसतो. परंतु भविष्यात शेतीच्या कामांमध्ये माणसाला फारसा हस्तक्षेप करावा लागेल असे वाटत नाही. शेतीच्या कामांना थेट हात लावण्याची तसेच पिकांची देखरेख करण्याची गरज जवळजवळ संपुष्टात येईल. आपल्या देशात शेतीचे स्वरूप असंघटित आणि अनियोजित असले, तरी भविष्यात ही पद्धती बदलणार आहे. जगात जे बदल या क्षेत्रात घडत आहेत, तेच आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. जगातील अनेक प्रगत देशांमधील शेतीचे स्वरूप अत्यंत सुसंघटित आणि नियोजनबद्ध आहे. शेती म्हणजे थोडीफार जमीन, बांधावर झाडे, छोटासा तलाव आणि आठ-दहा जनावरे असेच चित्र असते. हे चित्र काही वेळा मोठेही असते. परंतु शेती छोटी असो वा मोठी, त्याचे नियोजन करण्यासाठी संगणक, सॉफ्टवेअर, प्रोग्राम, अनेक प्रकारची सेन्सर असलेली अवजारे, अॅग्री किंवा फार्म रोबो, अॅग्री बोट, मायक्रोबोट अशी अत्याधुनिक सामग्री भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापरात येणार आहे. संगणक, सॉफ्टवेअर, इंटरनेट, सेन्सर, रोबो या सर्वांची मिळून एक स्वयंचलित यंत्रणा शेतातील कामे आणि शेताची देखभाल करताना पाहायला मिळेल. या प्रक्रियेत शेतक-याचा थेट सहभाग अत्यंत कमी असेल.
नांगरटीपासून सुगीपर्यंत शेतीची सर्व कामे वेळेवर आणि सक्षमपणे उरकण्यास ही यंत्रणा सक्षम असेल.
मातीचे परीक्षण करायचे असो वा हवामानाचा अंदाज घेऊन एखादा निर्णय घ्यायचा असो. या निर्णयाच्या आधारे शेतीत काय पेरायचे, कधी पेरायचे, त्यासाठी तयारी कोणती करायची, पेरणी करायची की रोपण करायची, पाणी कधी आणि कसे द्यायचे, देखभाल कशी करायची, पिकाची काढणी किंवा झाडावरील फळांची तोडणी कधी करायची, मळणी कशी करायची या सा-यांची कृतिशील उत्तरे देण्यासाठी मायक्रोबोट, अॅग्रीबोट रोबो आता तयार आहेत. भविष्यात ते शेतात सक्रिय होतील. हवा, जमीन, पाणी, कीटकांचे संभाव्य आक्रमण, बुरशीजन्य रोगांचे, किडींचे आक्रमण या सर्वांचा अभ्यास करून त्यानुरूप बी-बियाणे आणि औषधांची निवड यंत्रेच करतील. प्रत्येक शेताचे भौगोलिक स्थान तसेच जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन औषधे, खते, पाणी यांचे प्रमाण निश्चित करून त्या-त्या वेळी ती-ती कामे हे मायक्रोबोट्स करतील. सर्व कामांचे वेळापत्रक तयार करणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष काम करणे हे यंत्रमानवच करतील. त्यासाठी खास शेतीत उपयोगात आणला जाणारा रोबो लवकरच येत आहे.
आज अत्याधुनिक शेती म्हटले की ट्रॅक्टरचा वापर अनिवार्य आहे. ट्रॅक्टरशी संबंधित अनेक प्रयोग इक्विपमेन्ट टॅली मेट्रिक्स या तंत्रात सध्या सुरू आहेत आणि अनेक प्रयोगांना निर्णायक यश मिळण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. खरे तर यातील अनेक प्रकारचे तंत्र बाजारपेठेत दाखल होत आहे. येत्या काळात आपला ट्रॅक्टर आपल्याला एसएमएस पाठवेल. आपला एखादा भाग निकामी होत असल्याचे किंवा पूर्णपणे निकामी झाल्याचे या एसएमएसमधून ट्रॅक्टर स्वत:च आपल्याला सांगेल. त्यामुळे ट्रॅक्टरचा एखादा भाग खराब झाल्यामुळे कामाचा खोळंबा होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात येत असून, तांत्रिक बिघाडामुळे काम अडून नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे लाईव्हस्टॉक बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानात पशूंच्या संदर्भात अनेक प्रयोग होत आहेत.
गायी-म्हशींच्या गळ्यात घातलेला पट्टा त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती आणि तपशील पुरवत आहे. पशूंच्या आजारांकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा पशूंच्या एकंदर देखभालीत कमतरता राहिल्यास पशुपालन हा तोट्याचा व्यवसाय ठरू शकतो. परंतु नव्या बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानामुळे हा धोका टळू शकतो. आज शेती आणि शेतकरी हा विषय जरी काढला तरी दीनवाणा शेतकरी, त्याच्या डोक्यावरील कर्ज, निसर्गाची अवकृपा आणि या सा-याचा जाच अस झाल्यामुळे होणा-या आत्महत्या, असेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. परंतु शेतीशी संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दुष्काळ पडला आहे, असा त्याचा अर्थ नाही. भारतीय शास्त्रज्ञ शेतीच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करीत असून, त्यांना केवळ जागतिक मान्यताच मिळते आहे असे नव्हे तर भारतीय संशोधकांसोबत इतर देशांचे संशोधकही एकत्रितपणे काम करीत आहेत.
-जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञानलेखक