राजकोट : वृत्तसंस्था
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणमवर द्विशतकी खेळी केली होती. आता पुढच्याच राजकोट कसोटीत त्याने दुस-या डावात शतकी खेळी करत भारताला विजयाच्या मार्गावर अग्रेसर केले आहे.
तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी मोहम्मद सिराजने इंग्लंडला ३१९ धावात रोखले. भारताने १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुस-या डावात २ बाद १९६ धावा केल्या. सुरुवात संथ करणा-या यशस्वी जैस्वालने नंतर तुफान फटकेबाजी करत इंग्लंडचा बॅझबॉल मोडूनच खाल्ला. त्याला शुभमन गिलने नाबाद अर्धशतक ठोकत चांगली साथ दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा पहिला डाव ४४५ धावांवर संपला. इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. सिराजने ४ विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. बेन डकेटने एकाकी किल्ला लढवत १५३ धावांची दमदार खेळी केली. बेन स्टोक्सने देखील ४० धावांचे योगदान दिले. भारताने १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव सुरू केला. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने ३० धावांची सलामी दिली. मात्र, इंग्लंडने चांगला मारा केल्यामुळे भारताची सुरुवात संथ झाली. मात्र, रोहित बाद झाल्यानंतर यशस्वीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि दमदार शतक ठोकत भारताला सुस्थितीत पोहोचवले.