नवी दिल्ली : युक्रेनविरुद्धच्या लढाईत रशियाला मोठे यश मिळाले आहे. रशियाने युक्रेनमधील अवदिव्का शहर ताब्यात घेतले आहे. अवदीव्का हे युक्रेनचे पूर्वेकडील महत्त्वाचे शहर आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कारवाईमुळे लष्कराचे कौतुक केले असून हा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई सोइगु यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना याबाबत माहिती दिली.
रशियन संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की युक्रेनियन सैन्यासाठी अवदीव्का हे एक मजबूत संरक्षण केंद्र होते. मात्र आता अव्दिव्कावर रशियाने ताबा घेतल्याने युक्रेनला रशियावर हल्ला करण्यासाठी मोठ्या अढचणीचा सामना करावा लागणार आहे. युक्रेनचे लष्कर प्रमुखाने शनिवारी एक निवेदन जारी करून अव्दिव्कावर रशियाने ताबा मिळवल्याचे मान्य केले.
युक्रेनचे लष्करप्रमुख अलेक्झांडर सिर्स्की म्हणाले की, मी माझे सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतील. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.