नवी दिल्ली/ पुणे : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात उद्या आणि मंगळवारी वादळी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये १८ ते २० फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहे. राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी ओसरली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात, कोकण गोवा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हवामान अंशत: ढगाळ होत आहे.
जोरदार वारे वाहण्याची शक्यता
१९ ते २० फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ३० ते ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १ किंवा २ ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि ईशान्य भारतातही हलक्या पावसाची शक्यता आहे.