25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाची लोकसंख्या, ‘शेतकरी मराठा’ सर्वच आकडेवारी गोलमाल

मराठा समाजाची लोकसंख्या, ‘शेतकरी मराठा’ सर्वच आकडेवारी गोलमाल

तायवाडे यांचा आयोगावर निशाणा

नागपूर : मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आहोत.
सादर केलेली आकडेवारी गोलमाल करणारी दिसत आहे. मराठा समाजाची लोकसंख्या २८ टक्के असणे किंवा मराठा समाजातील ९४ टक्के शेतकरी आत्महत्या करतात, हे सर्व संशय निर्माण करणारे आहे, असा हल्ला ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आयोगावर केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मसुदा मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यानंतर त्याची माहिती समोर आली. त्यावर बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची शिफारस मागसवर्ग आयोगाने केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. आमच्या ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागला नाही, यामुळे ही समाधान देणारी बाब आहे. परंतु मराठा समाजाची २८ टक्के लोकसंख्या असल्याचे आयोगाने म्हटले आहे. हा घोळ वाटतोय. हा चिंतनाचा विषय आहे. यामुळे या विशेष अधिवेशनात राज्यातील संपूर्ण समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस करण्याचा ठराव करण्यात यावा. शासनाने जातनिहाय जनगणना करून कोणाची किती लोकसंख्या याचे आकडे जाहीर करावेत. सरकारने आम्हाला शब्द दिला होता. त्याची पूर्तता करावी.

मराठा समाजातील ९४ टक्के शेतकरी आत्महत्या

विदर्भ, कोकणात बहुसंख्य ओबीसी समाज आहे. मग मराठवाडा, पश्चिम महाष्ट्रात केवढी संख्या असेल, असा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी करत मराठा समाजाच्या २८ टक्के लोकसंख्येचे आकडेवारीवर संशय व्यक्त केला. तसेच मराठा समाजातील ९४ टक्के शेतकरी आत्महत्या हा आकडा संशय वाढवणारा आहे. कारण सर्वाधिक आत्महत्या विदर्भातील आहेत आणि विदर्भात ओबीसी समाज सर्वाधिक आहे.

महादेव जानकर यांचाही पाठिंबा

बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका महादेव जानकर यांनी घेतली. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून न घेता स्वतंत्र आरक्षणाची बाजू मांडावी. आमचा पण त्यांच्या त्या मागणीस पाठिंबा असणार आहे. त्यांनी ओबीसीमधून आरक्षण घेऊ नये.

मनोज जरांगे यांना फसवले : रवींद्र धंगेकर

लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आजचा आरक्षणाचा अहवाल असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना सरकारने फसवले आहे. सरकार मराठा समाजाला जे १० टक्के आरक्षण देत आहे, ते कोर्टात टिकणार आहे का?, असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR