भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा २३ फेब्रुवारीपासून रांची सामन्यातून बाहेर पडला. स्टार यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुल देखील चौथ्या कसोटीचा भाग असणार नाही असे बीसीसीआयने सांगितले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहांच्या मेलमध्ये असेही म्हटले आहे की, बुमराचा ताणतणाव कमी करण्यासाठी बोर्डाने त्याला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तसेच के. एल. राहुल अजूनही दुखापतीमधून सावरला नसल्याने तो चौथ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. यामुळे मुकेश कुमार हा संघात परतला आहे. खरे तर बुमरा नसल्यामुळे टीम इंडियाची ताकद कमी होणार आहे. त्याने हैदराबाद कसोटीत सहा, विशाखापट्टणममध्ये नऊ आणि राजकोटमध्ये दोन इंग्लिश फलंदाजांना तंबूत पाठवले होते.
पहिली हैदराबाद कसोटी इंग्लिश संघाने २८ धावांनी जिंकली होती. दुसरी विशाखापट्टणममध्ये बुमरामुळे इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून बरोबरी केली होती तर राजकोटमध्ये रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ४३४ धावांचा सर्वांत मोठा विजय मिळवत रोहित सेनेने २-१ ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम इंडिया खिशात घालेल. या कसोटी सामन्यात संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
मैदानाबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर